Me Time: सकारात्मक मानसिकता हवी असेल, तर हे नक्की वाचा

0

एकीकडे कोरोनाची चिंता तर, दुसरीकडे करिअरची. एकीकडे कुटुंबाची काळजी, तर दुसरीकडे अर्थार्जनाची! अशा कात्रीत अडकलेलो आपण लॉकडाऊनमुळे भरपूर वेळ मिळूनही स्वतःसाठी वेळ काढणंच (Me Time) विसरूनच गेलोय. पण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. 

“हे ‘वर्क फ्रॉम होम’ अगदी नकोसं झालं आहे. त्यापेक्षा ऑफिस बरं होतं.”

“वर्क फ्रॉम होम मुळे ‘ना घर का ना ऑफिसका’ अशी अवस्था झाली आहे.”

“ऑफिसचं आणि नोकरीचं काही खरं नाही. मला काहींना काही पर्याय शोधावाच लागणार आहे.”

अगदी गेल्या वर्षीपूर्वी आपण  घडाळ्याच्या काट्यावर आयुष्य जगत होतो. त्यांनतर कोरोना आला आणि अनेकांचं ‘वर्क फ्रॉम होम’ सुरु झालं.  ज्यांना ही सुविधा नव्हती त्यांना भविष्याच्या चिंतेने ग्रासलं. काहींनी फावल्या वेळेत करियरच्या दृष्टीने आवश्यक किंवा अगदीच नोकरी गेली तर, अर्थार्जनाचा काही ना काही पर्याय असावा, या विचाराने ऑनलाईन क्लास जॉईन केला, तर काहींनी पर्यायी उत्पन्नाचा मार्ग म्हणून वेबिनार, ऑनलाईन क्लास, टिफिन सर्व्हिस, आदी व्यवसाय सुरु केले. जगण्यासाठी पैसा आवश्यक आहेच, पण त्याची काळजी करण्यापेक्षा तो मिळवायचा कसा हा विचार करणं आवश्यक आहे. आयुष्याची आणि अर्थार्जनाची चिंता सतावत असेल, किंवा सततच्या कामाने थकून गेला असाल, तर यावर साधा उपाय आहे – स्वतःसाठी वेळ काढा. स्वतःसाठी वेळ काढून समस्या सुटणार नाही, पण ते सोडविण्यासाठी आवश्यक असणारी सकारात्मक मानसिकता नक्की तयार होईल. 

सोशल मीडियामुळे झालेला बदल 

 • साधारणतः १५ /२० वर्षांपूर्वी आपण कसं आयुष्य जगत होतो? आणि आज कसं जगतोय? आज  दिवसाचे ८ ते १२ तास आपण ‘प्रोफेशनल लाईफ’ जगत असतो आणि उरलेला वेळ “सोशल मीडिया” वर घालवतो. 
 • सोशल मीडिया अनेकांसाठी उत्पन्नाचे साधन बनली आहे. इथे अगदी कपड्यांपासून नोकरीपर्यंत प्रत्येक गोष्टीची जाहिरात करता येते. 
 • अनेकांना रोजगार मिळवून देण्यासाठी सोशल मीडिया महत्वपूर्ण भूमिका बजावतोय हे वास्तव नाकारून चालणार नाही. 
 • सुरुवातीला व्यवसायाची गरज म्हणून आणि नंतर सोशल मीडियाच्या मायाजालात हरवून जाऊन निखळ आनंद  आपण विसरूनच गेलो आहोत.आणि तासन तास सोशल मीडियावर सक्रिय राहिल्यामुळे वेळ मिळूनही कुटुंबाला आणि स्वतःला वेळ देण्यात आपण अपयशी ठरत आहोत. 
 • दिवसातल्या २४ तासांपैकी म्हणजे एकूण १४४० मिनिटांपैकी  किमान ४० मिनिटे तरी आपण स्वतःसाठी काढतो का? जर तुम्ही स्वतःसाठी वेळ काढत नसाल तर तो काढायला हवा. तुमच्या आयुष्यातल्या अनेक समस्यांचे  उत्तर तुम्हाला मिळेल. तुमच्या नैराश्याला दूर करून तुम्हाला आत्मविश्वास परत मिळवायचा असेल, आयुष्यात यशासोबत स्वास्थ्य हवं असेल तर, तुम्ही स्वतःसाठी वेळ काढायला हवा. 

Me Time: आयुष्यातली सर्वात कठीण “टास्क” म्हणजे -स्वतःची काळजी घेणे –

 • तुम्हाला सर्व गोष्टींसाठी वेळ असतो. नसेल तर तुम्ही काढता. पण स्वतःसाठी वेळ काढायचा म्हटलं तर आपण नेहमीच चालढकल करतो. 
 • कोणे एके काळी तुम्हाला बासरी वाजवायचा छंद असेल पण कित्येक दिवसांत तुम्ही बासरी वाजवणे तर दूरच ती बघितलीही नसेल.  
 • बागकाम, विणकाम, शिवणकाम, खेळ, वाचन अशा कितीतरी गोष्टी ज्या तुम्ही पूर्वी आवडीने करत होतात पण आता मात्र त्यासाठी अजिबात वेळ नाही.
 • आयुष्य बदललं,  जबाबदाऱ्या आल्या म्हणून स्वतःसाठी वेळ काढायचा नाही का? याचं उत्तर आहे वेळ काढायलाच हवा. फक्त जी गोष्ट पूर्वी सहज करत होतात यासाठी तुम्हाला आता प्रयत्नपूर्वक वेळ काढावा लागेल. 

स्वतःसाठी वेळ देणे  का आवश्यक आहे? 

 • तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार! आपल्याला आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.  सध्या तर एवढं नकारात्मक वातावरण आहे की अनेकांना नैराश्याने ग्रासले आहे. आपल्या वागण्याचा परिणाम कळत नकळत आपल्या कामावर व  निकटवर्तीयांवर होत असतो. 
 • जर दिवसभरातला थोडासा वेळ स्वतःसाठी काढलात. तर कदाचित तुम्हाला तुमच्यातल्या कलागुणांची नव्याने जाणीव होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. 
 • दिवसभराच्या धावपळीमुळे, चिंतेमुळे  शरीराबरोबरच मन आणि मेंदूही  थकत असतो. त्याला थोडासा विसावा नको का? हा विसावा या थोड्याशा वेळेतही मिळेल आणि तो पुरेसा असेल.
 • ताजंतवानं झालेलं मन आणि मेंदू मिळून तुमच्या आयुष्यातल्या समस्या सोडवायचे तसेच नातेसंबंध दृढ करण्याचे काम तुमच्याही नकळत अगदी सहज करू शकेल.
 • अनेकदा आपल्याला काय हवंय हेच आपल्याला माहिती नसतं. परिस्थितीमागे धावता धावता आपण परिस्थितीचे गुलाम कधी होतो हेच आपल्याला कळत नाही. आपण कसे होतो? आता कसे आहोत?  हे काय होतंय?  रोज असे अनेक प्रश्न आपण स्वतःला विचारतो पण समोरच्या कामांचा ढीग बघून, त्याची उत्तरे न शोधतच आपण त्यांना बाजूला सारतो.
 • स्वतःला समजून घ्यायचं असेल, तर स्वतःसाठी वेळ काढणे आवश्यक आहे. 

Me Time: स्वतःसाठी वेळ काढायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी ठामपणे करणे आवश्यक आहे- 

१. आपला  प्राधान्यक्रम (priorities) निश्चित  करा: आपल्यासाठी काय जास्त महत्वाचे आहे? हे एकदा निश्चित झाले तर, वेळेचे  व कामाचे  नियोजन  करणे सोपे  जाईल. त्यामुळे आपला  प्राधान्यक्रम निश्चित करा. 

२. नियोजन:  दिवसभराच्या / आठवडाभराच्या / महिनाभराच्या  कामांचे  व्यवस्थित  नियोजन केल्यास कामाचा  ताण  येणार नाही. सर्व कामे व्यवस्थित होतील व तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळेल.  

३. सोशल मीडियाचा मर्यादित  वापर करा: अनेकदा आपल्याकडे वेळ असतो पण तो आपण सोशल मीडियावर व्यतीत करतो. सोशल मीडिया नावाचं व्यसन दारू सिगारेटपेक्षाही भयंकर रूप धारण करत आहे. तेव्हा त्याचा वापर मर्यादित ठेवा. 

४.  ‘नाही’ म्हणायला शिका: अनेकदा अनेक गोष्टी आपल्याला करायच्या नसतात.पण निव्वळ नाही म्हणू शकत नाही म्हणून आपण त्या करत असतो. अशावेळी आपल्याला ठामपणे नाही म्हणता आले पाहिजे. तुमचे कुटुंबीय,  मित्रमैत्रिणी, नातेवाईक, सहकारी कोणीही समोर असलं तरी मनाविरुद्ध एखादी गोष्ट करण्यापेक्षा त्याला नाही म्हणायची तयारी ठेवा.

स्वतःसाठी वेळ काढणे ही गोष्ट केवळ तुमच्या वैयक्तिक  आयुष्यात  महत्वाची नाहीये तर, त्यामुळे  तुमच्या  कौटुंबिक व व्यावसायिक आयुष्यावरही  सकारात्मक परिणाम होणार आहे. त्यामुळे या गोष्टीचे महत्व ओळखा आणि दिवसभरातील / आठवडाभरात  थोडातरी वेळ स्वतःसाठी राखून ठेवा. सकारात्मक व्हा, आनंदी राहा.

Leave A Reply

Your email address will not be published.