Insurance Riders: विमा पॉलिसीमध्ये अतिरिक्त कव्हरेज देणारे “रायडर” तुम्हाला माहिती आहेत का?

0

आपल्या विद्यमान विमा पॉलिसीमध्ये जोडता येणारी अतिरिक्त कव्हरेज सुविधा म्हणजे विमा रायडर (Insurance Riders). यामुळे विस्तारित कव्हरेज घेता येते. मुदत विमा, आरोग्य विमा, वाहन विमा, जीवन विमा अशा जवळपास सर्वच विमा प्रकारांमध्ये रायडर्रची सुविधा उपलब्ध असते. तसेच जवळपास सर्वच विमा कंपन्या ही सुविधा आपल्या ग्राहकांना देतात. 

विमा प्रतिनिधी योजनेची माहिती देताना याबद्दल ग्राहकास कल्पना देतातच. परंतु, ग्राहकानेही याबद्दल विचारणा करणे आवश्यक आहे. तसेच विमा प्रतिनिधी अनावश्यक रायडर आपल्याला खरेदी करण्यासाठी गळ घालत असेल, तर त्यासाठी नकार देणेही हितावह आहे. अर्थात आपल्यासाठी कोणता रायडर आवश्यक आहे याचा निर्णय मात्र पॉलिसी व व्यक्तीनुसार बदलत जातो. आजच्या लेखात आपण जीवन विमा पॉलिसी आणि त्यासोबतचे रायडर याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. 

हे नक्की वाचा: Risk Management: जोखीम व्यवस्थापनात विमा योजनेचे महत्व

Insurance Riders: जीवन विमा पॉलिसी आणि विमा रायडर

 • जीवन विमा योजनेसोबत अपघाती मृत्यू आणि अपंगत्व यासाठी रायडर घेण्याची सोय आहे. कोणत्याही योजनेमध्ये मूळ विमा रकमेपेक्षा रायडरची विमा रक्कम कमी असते.
 • रायडर सुविधेमुळे विमा हप्त्यात प्रति हजारी विमा रकमेला (सम अश्युअर्ड) एक रुपया इतकी वाढ होते. म्हणजेच, दहा लाख रुपयांच्या विम्यासाठी १००० रुपयांचा हप्ता जास्त भरावा लागेल  
 • पॉलिसी घेताना रायडर घेतला नसेल तर, नंतर कधीही अधिकचा हप्ता भरून हा रायडर घेता येतो. रायडर घेण्यापूर्वी त्यासंदर्भातील नियम, अटी व फायदे कोणते समजून घेणे आवश्यक आहे.
 • सामान्यतः विमा पॉलिसीची रक्कम जेवढी असेल तेवढी अधिकची रक्कम अपघाती मृत्यू झाल्यास विमाधारकाला मिळते. अर्थात रायडरमध्ये विमाधारकाला किती रक्कम मिळेल हे विमा योजनेनुसार ठरते. 
 • अपघातात मृत्यू न होता विमेदारास अपघातानंतर १८० दिवसांच्या आत जर कायमचे अपंगत्व आले तर, विमेदाराला विम्याची मुदत पूर्ण होईपर्यंचे हप्ते माफ केले जातात. तसेच, पुढील १० वर्षे अपघाती मृत्यूची रक्कम (मृत्यू झाला नसला तरी) समान १२० मासिक हप्त्यांत दिली जाते. 
 • विमा योजनेची मुदत संपण्यापूर्वी जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर विमा रक्कम, बोनस आणि उर्वरित मासिक हप्त्यांची रक्कम दिली जाते.

विमा रायडर – काही महत्वाचे नियम

 • अपघात आणि खून किंवा अपघात आणि आत्महत्या या भिन्न गोष्टी आहेत. विमाधारकचा खून झाल्यास रायडरची रक्कम मिळेलच असे नाही. यासंदर्भात विविध केसमध्ये न्यायालयाने केसच्या पार्श्वभूमीनुसार वेगवगेळे निर्णय दिलेले आहेत. 
 • विम्याच्या करारामध्ये खून हा अपघात समजला जाणार नाही असे नमूद केले नसेल, तर तो अपघातच मानला जातो. मात्र असे नमूद केले नसेल आणि विमाधारकाची जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, तर मात्र असा मृत्यू अपघाती मृत्यू समजता येत नाही.
 • दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विमाधारकाचा मृत्यू अपघातानेच झाला असून ती आत्महत्या नाही हेदेखील सिद्ध करावे लागते. क्लेम मागताना पोलीस पंचनामा, पोलीस फायनल क्लोजर अहवाल अशा कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. 
 • आयआरडीएच्या नियमानुसार विमाधारकाचा अपघाती मृत्यू अपघातात झाल्यास सर्वप्रथम मूळ विमा रकमेच्या मृत्यू-दाव्याची रक्कम नॉमिनीला देणे अनिवार्य आहे. 
 • विमा  हा करार  आहे  यामध्ये  utmost good faith म्हणजेच विश्वासार्हता महत्वाची आहे. त्यामुळे विमा योजना घेताना पॉलिसीधारकाने कंपनीला सर्व खरी माहिती देणं आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला असणारे आजार, आपल्या कामाचे स्वरूप, आपली व्यसने व इतर सवयी याबद्दलची खरीखुरी माहिती देणे आवश्यक आहे.
 • तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे विमा कंपनी तुम्हाला पॉलिसी द्यायची की नाही यासंदर्भात निर्णय घेत असते. विमा पॉलिसी घेतल्यापासून वा पॉलिसीच्या नूतनीकरणापासून तीन वर्षांच्या आत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विमा कंपनीस विमाधारकाने दिलेली माहिती तपासून पाहण्याचा, तसेच विमा रक्कम द्यायची की नाकारायची याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आहे. 
 • अशा परिस्थितीत जर विमाधारकाने दिलेली माहिती खोटी होती अथवा खरी माहिती लपवली होती असे उघडकीस आल्यास विमा कंपनी क्लेम नाकारू शकते व त्या परिस्थितीत तुम्ही भरलेले हप्तेदेखील परत मिळत नाहीत. मात्र अशा परिस्थितीत पॉलिसीमध्ये अपघाती मृत्यू व अपंगत्व यासाठी रायडर घेतलेला असल्यास आणि विमा धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास विमा कंपनी रायडरचा क्लेम नाकारू शकत नाही.

विशेष लेख: Fire and Burglary Insurance: आग व घरफोडीपासून विमा संरक्षण

विमा राइडर्सचे ८ मुख्य प्रकार 

 1. प्रीमियम राइडरची सूट (Waiver of Premium Rider)
 2. अपघाती मृत्यू (Accidental Death Rider)
 3. गॅरंटीड इन्शुरबिलिटी राइडर (Guaranteed Insurability Rider)
 4. फॅमिली इनकम बेनिफिट राइडर (Family Income Benefit Rider)
 5. चाईल्ड टर्म राइडर (Child Term Rider)
 6. प्रवेगक मृत्यू लाभ राइडर (Accelerated Death Benefit Rider)
 7. लाँग टर्म केअर रायडर(Long-Term Care Rider)
 8. प्रीमियम रायडरचा परतावा(Return of Premium Rider)

जवळपास सर्व प्रकारच्या विमा योजनांमध्ये गंभीर आजार, अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व अशा काही गोष्टींसाठी रायडर उपलब्ध असतात. आपल्या आवश्यकतेनुसार रायडरचे नियम व अटी समजून घेऊन पॉलिसीसोबतच रायडर घ्यावेत.

Leave A Reply

Your email address will not be published.