कायम चर्चेत असलेले आयोध्येतील राम मंदिर अखेर उभे राहणार आहे. या राम मंदिराची रचना कशी असेल, हे मंदिर उभे राहिला किती दिवस लागतील? तसेच या मंदिरात खास असे काय असणार आहे ? याबाबत आर्किटेक्ट चंद्रकांतभाई सोमपुरा यांनी सविस्तर माहिती दिली आहे. हे मंदिर नागर शैलीत 5 घुमट्यांसह बांधले जाईल. यातून आता मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेऊ शकतील, असे त्यांनी सांगितले.
अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिर त्याच्या मूळ रचनेच्या दुप्पट असेल. मंदिराचा नकाशा तयार करणाऱ्या आर्किटेक्ट चंद्रकांतभाई सोमपुरा यांनी सांगितले की, गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिराच्या रचनेत बदल करण्यात आला आहे. हे मंदिर नगार शैलीमध्ये 5 घुमट्यांनी बांधले जाईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिराच्या रचनेत सुधारणा करण्यात आली. हे आता जुन्या मॉडेलच्या आकारापेक्षा जवळपास दुप्पट असेल. आता या गर्भगृहाच्या अगदी वरच्या बाजूस एक शिखर असेल आणि त्यास 5 घुमट असतील. मंदिराची उंचीही पूर्वीपेक्षा जास्त असेल.
77 वर्षीय सोमपुरा नकाशाच्या निर्मात्यांच्या कुटुंबातून आले आहेत. त्यांनी अशा 200 पेक्षा अधिक वास्तूंची रचना केली आहे. ते म्हणाले की, विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत नेते अशोक सिंघल यांनी सुमारे 30 वर्षांपूर्वी राम मंदिराचा नकाशा तयार करण्यास सांगितले होते.
याआधीही सोमपुरा यांनी मंदिराची रचना केली होती. ते म्हणाले की, 30 वर्षांपूर्वी राम मंदिराची रचना करणे एक अवघड काम होते, कारण मोजमापाचे एकक म्हणून पायाच्या पाऊलांंचा वापर करून त्याला रेखाचित्र तयार करावे लागले. सोमपुरा म्हणाले, ‘1990 मध्ये मी जेव्हा अयोध्येत पहिल्यांदा त्या ठिकाणी गेलो होतो तेव्हा सुरक्षेच्या कारणास्तव त्या आवारात काहीही घेऊन जाण्यास परवानगी नव्हती. मोजमाप करणारी टेपसुद्धा माझ्याजवळ ठेवण्याची परवानगी नव्हती, मला माझ्या पाऊलांंच्या मदतीने अंतर मोजावे लागले. ‘
आता मोजमाप करण्यात कोणतीही अडचण नाही. तसेच नवीन मंदिराच्या रचनेत बदल करण्यात आले आहेत. मंदिराच्या जुन्या रचनेनुसार ती दोन मजली होती. त्या मंदिरात तीन मंडप आणि शिखर होते. मंदिराची उंची 141 फूट उंच होती. आर्किटेक्ट चंद्रकांतभाई सोमपुरा यांच्या मते, नवीन मंदिर पूर्ण होण्यास तीन ते साडेतीन वर्षे लागतील. हे मंदिर तीन मजली असेल आणि वास्तुशास्त्रानुसार ते बांधले जाईल.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
आयोध्येत येत्या 5 ऑगस्ट रोजी होणार्या राम मंदिर भूमिपूजनाची तयारी जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: येथे येऊन राम मंदिराच्या निर्मितीचा पायाभरणी करतील. रामजन्मभूमी संकुलात यापूर्वीच मोठ्या प्रमाणात वॉटर-प्रूफ मांडव घालण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या मांडावामध्ये सुमारे 200 लोक बसण्याची क्षमता आहे. आजूबाजूच्या भिंतीही रामायणाच्या चित्रांनी सजवल्या आहेत.
मंदिराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमानंतर उपस्थित असलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून शुध्द देशी तुपापासून बनवलेले लाडू वाटण्यात येणार आहे. तब्बल 1 लाख 11 हजार खास देशी तूप लाडू प्रसाद म्हणून बनविण्यात येणार आहेत.