भारतीय जगात कुठे नाहीत आज प्रत्येक सहाव्या माणसानंतर एक भारतीय असे गुणोत्तर 2011च्या जणगणनेनुसार समोर आले. भारतात लोकसंख्येला कोणताच तोटा नाही. तर जगात देखील भारतीय मोठ्या प्रमाणावर पसरले आहेत.
अगदी स्वातंत्र्य पूर्व काळापासूनच भारतीय हे विदेशामध्ये गेले होते. काही शिक्षणाच्या निमित्ताने तर काही नोकरीच्या निमित्ताने विकसित देशांमध्ये जात होते. काही भारतीय हे परत मायदेशी आले तर काहींनी विदेशातील विकास पाहून तिथेच राहणे पसंत केले.
आजही जगाच्या अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय पाहिला मिळतील. जे आता तेथील स्थानिक नागरिक झाले आहेत. अनेकांना इंग्लंड, अमेरिका, फ्रांस, स्पेन सारख्या देशांचे नागरिकत्व मिळाले आहे. जरी हे भारतीय मुळचे आपल्या वंशांचे असले तरी त्यांनी मात्र त्या राष्ट्रांंचा स्वीकार केला आहे.
आपण अनेकदा क्रिकेट बघताना वेस्ट इंडीज टीम मधील खेळाडूंची नावे ऐकून आश्चर्य व्यक्त करतो. यांची नावंं भारतीय कशी आहेत. जसे की, शिवनारायण चंद्रपॉल, सुनील नारायण, राम नरेश सारवान, अशी अनेक नावं आपण वेस्ट इंडीज संघात ऐकतो. यावेळी मात्र आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की हे सर्व भारतीय वंशांचे खेळाडू तिकडे कसे गेले ? याबाबतच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
#वेस्ट इंडीज देश नाही तर एक समूह
सर्वात आधी हे अनेक जणांना माहित नसते की वेस्ट इंडीज हा देश नसून अनेक छोट्या बेटांचा समूह आहे. ही बेटंं उत्तर अटलांटिक समुद्राच्या पूर्व भागात आहे (उत्तर अमेरिका आणि मॅॅक्सिकोच्या मध्ये) . इथे अनेक छोटी मोठी बेटंं आहेत. मात्र त्यापैकी 15 क्रिकेट प्रेमी बेटांनी एकत्र येऊन अंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्यासाठी एक समूह स्थापन केला आहे. या भागातील लोकांना तसे कॅरीबियन म्हणून ओळखले जाते. परंतु अंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळताना हे वेस्ट इंडीज नावाने खेळतात.
#वेस्ट इंडीज संघात भारतीय कसे ?
वेस्ट इंडीज संघात अनेक भारतीय नावं आहेत. हे भारतीय तिथे पोहचले कसे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला ब्रिटीश काळात जावे लागेल. अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकात ब्रिटीशांचे आशिया आणि आफ्रिका या दोन खंडावर चांगले वर्चस्व होते. भारतात मसाल्याच्या पदार्थ्यांच्या व्यापारा निमित्त आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने भारतात हळूहळू आपले राज्य स्थापन करण्यास सुरवात केली. याचवेळी ब्रिटिशांनी आपल्या वसाहतींचा विस्तार अमेरिका खंडात देखील केला. कॅरिबियन बेटांवरही ब्रिटीश, फ्रेंच, डच, पोर्तुगीज येऊन पोहचले. निर्मनुष्य असलेल्या या भागात युरोपियन शासकांना पैसा दिसू लागला. तेथील हवमान आणि नैसर्गिक संसाधनांची उपलब्धता ही ब्रिटिशांना भलतीच आवडली. त्यानंतर ब्रिटीश आणि इतर युरोपियन शासकांनी कॅरिबियन बेटांवर वर्चस्व गाजवण्यास सुरवात केली.
या बेटांवरील हवमान नगदी पिकांसाठी उत्तम असल्याने ब्रिटिशांनी याभागात शेती करण्याचा निर्णय घेतला. मसाल्याचे पदार्थ, चहा, ऊस, नीळ, तंबाखू ही प्रमुख व्यापारी पिकं घेण्यासाठी ब्रिटिशांनी काही व्यवसायिकांना बेटांवरील जागा भाड्याने देण्यास सुरवात केली. आता शेतीची मशागत करण्यासाठी व्यवसायिकांना माणसांची गरज होती. ही मुबलक मॅॅन पावर भारतात आणि आफ्रिकेत होती. शिवाय येथील नागरिकांना शेतीचे ज्ञान आणि कसण्याची पद्धत देखील माहिती होती. त्यामुळे ब्रिटिश व्यवसायिकांनी शेतीसाठी गुलाम शोधताना आपला मोर्चा आफ्रिकेकडे वळवला. अनेक आफ्रिकन नागरिकांना बोटीत भरून गुलाम म्हणून कॅरिबियन बेटांवर नेले. तिथे त्यांच्याकडून हाणूनमारून शेती करून घेऊ लागले. गुलामांवरील वाढते शोषण लक्षात घेऊन 1833 मध्ये ब्रिटीश पार्लामेंटने कायदा आणून गुलाम पद्धत बंद केली. यामुळे ब्रिटीश व्यवसायिकांना मोठा फटका बसला.
#5 वर्षाचा खोटा करार
नवीन कायद्यामुळे आफ्रिकन नागरिक तब्बल शंभर वर्षांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाले. पुढे ब्रिटीश व्यवसायिकांनी आपला मोर्चा भारताकडे वळवला. भारतातील नागरिकांना लेबर म्हणून कॅरिबियन बेटांवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागले. 19 व्या शतकाच्या मध्यापर्यंत ब्रिटिशांनी भारतीय शेतीची पूर्णपणे वाट लावली होती. केवळ नगदी पिके घेण्याच्या कायदा करत भारतीयांना उपाशी मरण्याची पाळी आली होती. त्यामुळे निरक्षर भारतीयांना फसवून खोट्या 5 वर्षाच्या करारावर कॅरिबियन बेटांवर घेऊन जाण्यात आले. या बेटांवर जाण्यासाठी जहाजाने तब्बल 5 ते 6 महिने लागत. मात्र तिथे जाई पर्यंतच अनेक भारतीय जहाजात मरण पावत.
#काय होता करार ?
भारतीयांनी स्वाक्षरी म्हणजे अंगठा उमटवलेल्या या करारावर लिहिले होते की, तुम्हाला 5 वर्षासाठी शेतीच्या कामा निमित्त कॅरीबियन बेटांवर मजूर म्हणून स्थलांतरीत करत आहोत. हा करार केवळ 5 वर्षाचा असेल त्यानंतर तुम्हाला भारतात पुन्हा आणले जाईल. हा करार संपूर्ण इंग्रजीत होता. त्यामुळे भारतीयांना ती समजण्या पलीकडे होता. याच गोष्टीचा फायदा घेऊन भारतीयांना कॅरीबियन बेटावर नेण्यात आले.
जे काही भारतीय तिथे पोहचले त्यांच्याकडून मात्र लेबरच्या नावाखाली गुलामी करून घेतली. भारतीय शेतीत तरबेज असल्याने ब्रिटीश व्यवसायिकांना चांगला फायदा मिळू लागला. कराराप्रमाणे 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर भारतीयांनी मायदेशी जाण्याचा आग्रह धरला. मात्र जुलमी ब्रिटिशांनी या मजुरांना शिक्षा म्हणून अजून 5 वर्ष काम करण्यास सांगितले.
ब्रिटीश व्यावसायिकांनी 20 शतकापर्यंत जवळपास 8 लाख भारतीय कॅरिबियन बेटांवर स्थलांतरीत केले. हे त्यावेळी जगातील सर्वात मोठे स्थलांतर होते. ब्रिटिशांच्या जुलमी प्रवृत्तीमुळे अनेक गेलेले भारतीय कधीच मायदेशी परतले नाही. ते तिथेच स्थायिक झाले. पुढे या भारतीयांनी तिथेच एक नवे राष्ट्र उभे केले आणि तिथेच वंश वाढवू लागले. त्यामुळे आजही कॅरिबियन बेटांवर अनेक भारतीय वंशाचे लोक पहिला मिळतात. त्यापैकीच शिवनारायण चंद्रपॉल, सुनील नारायण, राम नरेश सारवान हे क्रिकेटर आहेत. यांचे पूर्वज हे भारतीय होते. त्यावेळी स्थलांतरीत झालेले भारतीय हे उत्तर प्रदेश, बंगाल, मध्यप्रदेश, उडीसा या राज्यांमधील होते.
(ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर पुढे नक्की शेअर करा…)