देशाला राष्ट्रगीत देणाऱ्या टागोरांबद्दल माहिती असेल, पण राष्ट्रध्वज देणारी ‘ही’ व्यक्ती कायम राहिली पडद्याआड
जर कोणी आपल्याला भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले असा प्रश्न विचारला तर आपण अगदी सहज उत्तर देऊ की रवींद्रनाथ टागोर, पण भारताचा तिरंगा कोणी तयार केला हा प्रश्न जर कोणी विचारला तर आपल्याला बराच काळ विचार करावा लागेल. कारण भारताचा राष्ट्रध्वज असलेला तिरंगा तयार करणाऱ्या महान व्यक्तीचे नाव आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहीतच नाही.
आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून याच महान व्यक्तीची माहिती करून देण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत. भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा डिझाईन करणाऱ्या या महान व्यक्तीचे नाव आहे पिंगली वेंकय्या.
पिंगली वेंकय्या यांचा जन्म २ ऑगस्ट १८७६ साली आंध्र प्रदेशातील मछलीपटणम् ( मसुलीपटणम्) येथे झाला. वयाच्या १९ वर्षी त्यांनी ब्रिटिश सेनेत नोकरी स्वीकारली. ब्रिटिश सेनेत नोकरी करीत असले तरी देखील वेंकय्या जींचे राष्ट्रप्रेम देशप्रेम तसूभरही कमी झाले नव्हते. हेच राष्ट्रप्रेम त्यांना शांत बसू देत नव्हते. पिंगली वेंकय्या हे दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांची भेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत झाली. आणि पिंगली वेंकय्या यांच्या जीवनाला एकप्रकारे कलाटणी मिळाली. म.गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आयुष्यभर गांधीजींच्या सानिध्यात राहण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले. पिंगली वेंकय्या हे एक विशेषज्ञ होते. लेखक होते. १९१३ मध्ये त्यांनी जापानी भाषेत एक मोठे भाषण वाचले होते. या वाचनावरुनच त्यांना “जापान वेंकय्या”, “पट्टी वेंकय्या” आणि “झेंडा वेंकय्या” असली टोपणनावे त्यावेळी भेटली होती.
भूशास्त्रज्ञ असलेले पिंगली वेंकय्या यांनी मछलीपटणम इथे एक शैक्षणिक संस्था उभारली होती. भुशास्त्राबरोबरच शेतीमध्येही त्यांना रस होता. १९१६ मध्ये त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केले. यात त्यांनी ३० वेगवेगळ्या देशांच्या ध्वजांचा अभ्यास करुन आपला भारतीय ध्वज कसा निर्माण करता येइल याबद्दल लिहिले होते. १९१८-१९२१ या प्रत्येक वर्षीच्या कॉंग्रेस अधिवेशनात त्यांनी देशासाठी स्वत:च्या ध्वजाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला होता.
शेवटी १९२१ विजयवाडा येथील कॉंग्रेस समितीच्या बैठकीत महात्मा गांधी यांनी पिंगली वेंकय्या यांच्या डिज़ाइनचा स्वीकार केला. याबद्दल गांधीजींनी त्यांच्या ‘यंग इंडिया’ या वृत्तपत्रातही लिहिले होते.
“मछलीपटणम येथील आंध्र राष्ट्रीय महाविद्यालयात काम करत असलेल्या पिंगली वेंकय्या यांनी वेगवेगळ्या देशांचे ध्वज वर्णन करत एक पुस्तक लिहिले असुन आपल्या राष्ट्रीय ध्वजासाठी काही डिझाईनसुद्धा सुचवल्या आहेत. कॉंग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी घेतलेल्या कष्टांसाठी मी त्यांची स्तुती करतो.” अशा आशयाचे शब्द महात्मा गांधी यांनी पिंगली वेंकय्या यांच्यासाठी यंग इंडियाच्या लेखात लिहिले होते.
यावेळी बनवलेल्या झेंड्यामध्ये लाल, हिरवा आणि पांढरा रंग होता, मध्ये निळ्या रंगात चरखा होता. यात लाल रंग हा हिंदू धर्मीयांसाठी, हिरवा रंग मुस्लिम धर्मीयांसाठी आणि पांढरा रंग बाकीच्या धर्मांसाठी होता.
१९३१ मध्ये तिरंगा स्वीकारला गेला. स्वीकारताना त्यात काही बदल केले गेले. लाल रंगाऐवजी केसरी रंग निवडण्यात आला. २२ जुलै, १९४७ ला संविधान सभेने या ध्वजास राष्ट्रीय ध्वज म्हणून जाहीर केले. काही वेळेनंतर यात पुन्हा बदल करण्यात आला आणि चरख्या ऐवजी अशोक चक्रास स्थान देण्यात आले. काहींच्या मते या निर्णयावर महात्मा गांधी जास्त खुश नव्हते. यातील रंगांचे अर्थही बदलण्यात आले.भगवा रंग समृद्धीचे प्रतीक, पांढरा रंग शांततेचा प्रतीक आणि हिरवा रंग प्रगतीचे प्रतीक म्हणून स्विकारण्यात आले. तसेच २४ तासांचं महत्त्व सांगणारे २४ आऱ्यांचे अशोक चक्र मध्यभागी स्विकारण्यात आले.
अशाप्रकारे भारताच्या एकतेचं दर्शन घडवून आणणाऱ्या तिरंगी ध्वजाची सुरुवात पिंगली वेंकय्या यांच्या कल्पनेतून झाली. एवढे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या पिंगली वेंकय्या यांच्या वाट्याला आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र गरिबी आली. देश आणि त्यांच्या पक्षानेसुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. अशा दुर्लक्षित अवस्थेतच ४ जुलै १९६३ रोजी त्यांचा मृत्यू झाला.