fbpx

‘असेन मी, नसेन मी तरी असेल गीत हे’ ! शांता शेळकेंची गोष्ट

0

” भावनांची कोवळीक
आज गोठुनिया गेली
माझ्या हृदयात तिची
थंडगार शिळा झाली

अंतरीचा घनश्याम
बसून त्या शिळेवरी
वाजवितो कधी – कधी
जुन्या स्मृतींची बासरी

ऐकूनही संगीत हे
शिळा निश्चल राहते
शून्य दगडी डोळ्यांनी
संथ सभोती पाहते !! “

अशा एकापेक्षा एका सरस कविता ज्यांनी महाराष्ट्राला दिल्या. त्या महाराष्ट्राच्या लाडक्या कवयित्री शांता शेळके. म्हणजेच शांताबाई !!आज 12 ऑक्टोबर. कवयित्री शांता शेळके यांचा जन्मदिवस. शांताबाईंचा जन्म इंदापूरचा. पण त्यांच बालपण हे खेड, मंचर या ठिकाणी गेलं. शांताबाईंचे वडील फॉरेस्ट ऑफिसर असल्याने त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. शांताबाई या घरात सगळ्यात मोठ्या होत्या. शांताबाईंच्या आई या शांत, मृदू स्वभावाच्या होत्या. त्यांना चित्रकलेच, आणि वाचनाच विलक्षण वेड होतं. तेच संस्कार नकळत शांताबाईंवर होत गेले. शिवाय लहानपणी आजोळला गेल्यावर तिथं पारंपारिक गीत, ओव्या हेही सतत त्यांच्या कानावर पडायचं. खरं तर कोणत्याही चांगल्या गोष्टींचे संस्कार किंवा वाचनाचे संस्कार हे त्यांच्यावर लहानपणीच झाले असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.

1930 मध्ये त्यांच्या वडिलांच निधन झालं. त्यावेळी त्या अवघ्या नऊ वर्षांच्या होत्या. मग पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुणे गाठलं. आणि इथंच अभ्यासाच्या पुस्तकाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची, कवितेची गोडीही वाढत राहिली. साहित्याचे सखोल संस्कार त्याच्यावर झाले. कॉलेजच्या नियतकालिकासाठी त्यांनी पहिला लेख लिहिला. आणि इथूनच त्यांच्या लेखनाची सुरुवात झाली. 1944 मध्ये शांताबाई संस्कृत घेऊन एम. ए झाल्या. तेव्हा त्यांना तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक मिळालं. एम. ए. झाल्यावर त्यांनी आचार्य अत्रे यांच्या ‘ समीक्षक ‘ मासिकात, ‘ नवयुग ‘ या अत्र्यांच्या साप्ताहिकात आणि ‘ दैनिक मराठा ‘ मध्ये काम केल. विविध प्रकारच्या लेखनाची अनुभव शिदोरी त्यांना येथे मिळाली.

नागपूरचं हिस्लॉप कॉलेज, मुंबईचं रुईया कॉलेज आणि महर्षी दयानंद महाविद्यालयात त्यांनी अनेक वर्ष अध्यापन केलं. विविध साहित्य प्रकारात शांताबाईंची जवळपास शंभर पुस्तकं प्रकाशित झाली. त्यामध्ये ‘वर्षा ‘, ‘गोंदण ‘, ‘ बासरी ‘, ‘ पूर्वसंध्या ‘ हे सांगता येतील. ‘ धूळपाटी ‘ हे त्यांच आत्मपर लेखन आहे. विविध साहित्यप्रकारात विहार करूनही त्यांच पहिलं आणि खरं प्रेम हे कवितेवरच. भावकवितेपासून नाट्यगीत, भक्तीगीत, कोळीगीत, चित्रपटगीत अशा अनेक रूपातून त्यांची कविता आपल्याला भेटते.

” रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी “

यासारखी लावणी लिहिणाऱ्या शांताबाई या मराठीतल्या पहिल्या स्त्री लावणीकार होत्या.
शांता शेळके यांच्या कविता म्हणजे आपल्या समुद्रासारख्या अथांग मनाचा थांगपत्ता घेणाऱ्या कवितांचा खजिनाच जणू !! मानवी मनाच्या अनेक भावभावनांचे कल्लोळ त्या आपल्या शब्दातून अलगद आणि हळुवार पणे काव्यशेल्यात गुंफण्याच कसब शांताबाईंकडं होतं.

“ओलेत्या पानात, सोनिया उन्हात भरून मेघ आले,
डहाळी जणू नवी नवरी हळद रंग ओले ”  या कवितेतून त्यांचं निसर्गावरच प्रेम आपल्याला दिसत.

” ही वाट दूर जाते स्वप्नांमधील गावा, माझ्या मनातला का तेथे असेल रावा? “ या कवितेत त्यांनी स्वप्नसृष्टीच वर्णन केलंय.

” विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा, भातुकलीच्या साऱ्या तुम्ही केला चट्टामट्टा ! “ हे गाणं ऐकताना आजही आपल्याला बालपण अनुभवता येत.

खरं तर शांताबाई या आपल्या प्रत्येकालाच वयाच्या विविध वळणावर विविध अवस्थेतून त्यांच्या कवितेमधून भेटतात. आज शांताबाई आपल्यात नसल्या तरी त्यांच्या अनेक कवितांमधून त्या कायम आपल्या मनात राहतील. शेवटी त्यांनी त्यांच्या कवितेतून म्हटलंच आहे…..

” असेन मी, नसेन मी
तरी असेल गीत हे
फुला – फुलांत येथल्या
उद्या हसेल गीत हे… “

 – कोमल पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.