महाराष्ट्राची प्राचीन मंदिर ही महाराष्ट्राची शान आहे. यामध्ये अनेक धार्मिक मंदिरंं, पुरातन मंदिरंं, यांचा समावेश आहे. बऱ्याचदा आपल्याला मंदिरांच्या बाबतीत माहिती असते पण ही मंदिरंं साधारण किती प्राचीन आहेत किंवा त्यांचा इतिहास काय आहे याबद्दल माहिती नसते. आपल्या महाराष्ट्रात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. ही देवस्थान फिरायला प्रत्येकालाच आवडत असतं. कारण त्याला एक इतिहास लाभला आहे. त्याशिवाय अनेक मंदिरांचं कलाकुसर हेदेखील फिरण्याचे कारण आहे. वास्तु शिल्पकारांनी बांधलेली ही मंदिरंं आपल्या महाराष्ट्रातील अप्रतिम कलाकुसर आहे. अशाच काही प्राचीन मंदिरांबाबत आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला जाणून घेऊया औरंगाबाद मधल्या वेरूळच्या कैलास मंदिराबद्दल.
हे मंदिर औरंगाबाद शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या वेरूळ गावातील जगप्रसिद्ध मंदिर किंवा लेणी आहे. वेरूळमध्ये असलेली सोळाव्या क्रमांकाची लेणी म्हणजे कैलास मंदिर किंवा कैलास लेणी. कैलास मंदिराकडे जगातले स्थापत्यशास्त्राचे अद्भुत उदाहरण म्हणून पाहिले जाते.
या मंदिराबाबत जाणून घेयचे झाले तर आपल्याला आधी चालुक्य आणि राष्ट्रकुट घराण्याचा काळ समजून घ्यावा लागेल. सहाव्या शतकात तब्बल 150 वर्षांची परंपरा आणि यशोधन असा इतिहास ” बदामी ” राज्याला लाभला होता. चालुक्य घराण्याची “बदामी ” ही राजधानी होती. हा काळ. इ. स. 731 ते इ. स. 739 दरम्यानचा. याच काळात चालुक्यांच्या राज्यावर अरबांचे आक्रमण झाले. हे आक्रमण “दंतिदुर्ग ” याने पळवून लावले. पुढे चालुक्यांच्या विजयानंतर दंतिदुर्गाने चालुक्यांचा राजा कीर्तिवर्मन याच्यावर आक्रमण करुन त्याचा पूर्ण पराभव केला. या कीर्तिवर्मन राजावर मिळवलेला विजय म्हणजे भारतीय उपखंडातील दक्षिणेकडच्या बलाढ्य ” राष्ट्रकुटांच्या ” राजघराण्याची मुहूर्तमेढ आणि पायाभरणी होती. त्यानंतर इ. स. 753 ते इ. स. 970 अशी एकंदर 220 वर्ष राष्ट्रकुट घराण्याची सत्ता होती. ही सत्ता अरवली पासून ते सह्याद्री पर्यंत आणि निलगिरी पर्वत रांगांच्या पूर्वेला साधारण 8-9 पिढ्या आपला पदन्यास करत होती.
वेरूळच्या अभूतपूर्व अशा कैलास मंदिराचं बांधकाम हे राष्ट्रकुट घराण्याचे दुसरे उत्तराधिकारी राजा ‘ कृष्णा ‘ यांच्या कारकिर्दीत झालं. हे त्यांच्या कारकिर्दीत झालेलं ऐतिहासिक कार्य मानलं जातं. वेरूळच्या इतर सर्व लेणी आणि कैलास मंदिर यांच्यामध्ये कोणाच्याही नजरेला अगदी स्पष्ट दिसणारा अनन्यसाधारण असा फरक आहे. सर्वच लेणी जरी एकाच शिळेपासून घडवलेली असली तरीसुद्धा “कैलास मंदिर ” या लेण्याचा थाट आणि दिमाख काहीसा अनोखा, नितांत रमणीय असा आहे. या मंदिराच्या काही गोष्टी खूप गूढ आणि रम्य आहेत. हे मंदिर घडवण्यासाठी इथल्या कोरुन काढलेल्या शिळांचं वजन अंदाजे 2 लाख टन एवढं भरेल. एका प्रस्तरातून वर आकाशापासून ते पृथ्वीपर्यंत कोरत आणलेलं हे मंदिराचं शिल्प अनेक हत्तीवर विराजमान असलेला रथ असावा, असा भास निर्माण करत.
मंदिराच्या उत्तरेला महाभारतातली तर दक्षिणेला रामायणातल्या युद्धांची विविध शिल्पं कोरलेली आहेत. त्याचबरोबर प्रत्येकी एक-एक स्तंभ, मंदिराच्या छतावर वर्तुळाकार असे चार सिंह आहेत. या व्यतिरिक्त गाभाऱ्यात आणि मंदिराच्या विस्तीर्ण पटांगणात कोरलेल्या मूर्ती. मग ती गणेशाची असो, हिरण्यकश्यपूचा वध करणाऱ्या विष्णूच्या नृसिंह अवतारातली असो किंवा अर्धनारी नटेश्वराची !!! प्रत्येक मूर्ती त्या वेळच्या या शिल्पकारांच्या करांगुलीमध्ये वसलेल्या सरस्वतीची जाणीव, ठायी – ठायी प्रत्येकाला करुन देतात. वेरूळ मधलं हे ” कैलास मंदिर ” मानवाच्या उत्क्रांतीतील आणि हजारो वर्षांच्या ‘ ज्ञात अज्ञात ‘ इतिहासातील अत्यंत मौल्यवान अशा जाणिवांचं एक सौंदर्यपूर्ण असं अस्फूट दालन आहे.
हे मंदिर घडवण्यासाठी कितीतरी वर्ष लागली असल्याचं सांगितलं जात. एक असाही अंदाज लावला जातो की, हे मंदिर घडवण्यासाठी 7 हजार कामगार दिवस रात्र काम करत असतील तेव्हा हे मंदिर काही शेकडो वर्षानंतर निर्माण झाले असेल. या मंदिराची भव्यता आणि रेखीव नक्षी काम आपल्याला अचाट करते. केवळ मोजक्या उपकरणांच्या आणि हत्यारांच्या सहायाने हे मंदिर कसे घडवले असेल, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. खांबांवर आणि दगडाच्या भितींवर कोरलेले रामायण महाभारतातील प्रसंग हे संपूर्ण युगाची कहाणी सांगून जातात.
या मंदिराला पाहण्यासाठी अनेक विदेशी पर्यटक येत असतात. स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासकांसाठी हे मंदिर एक उत्तम उदाहरण आहे. या ठिकाणी येऊन अनेक वैज्ञानिकांनी या मंदिराच्या निर्माणचे संशोधन केले. मात्र अजूनही हे मंदिर कसे निर्माण झाले असेल याबाबत निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरंं अजूनही अनुत्तरीत आहेत.
– कोमल पाटील
हे पण वाचा
#Gold : काय आहे नेमकं सोन्याचं आणि अंतराळाचं कनेक्शन ? माहित नसेल तर पटकन वाचा
भारतात तर सोन्याच्या खाणीचं नव्हत्या, मग का म्हणायचे भारताला ‘सोने की चिडीया’? घ्या जाणून