एअरपोर्टची यंत्रणा आता रेल्वे स्टेशनवर, इथून पुढे रेल्वेची तिकिटे ही QR कोडने चेक केली जाणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने आपल्या कार्यपद्धतीत बदल केले आहेत. आता इथून पुढे रेल्वेची तिकिटे ही QR कोडने चेक केली जाणार आहेत. यामुळे प्रवासी आणि तिकीट चेकर यांच्यात संपर्क होणार नाही. जेणेकरून दोघांच्याही जीवाला यामुळे संरक्षण मिळेल.
एअरपोर्ट यंत्रणा
याआधी एअरपोर्टवर अशा पद्धतीची तपासणी केली जायची. मात्र आता रेल्वे स्टेशनवर देखील संपर्क टाळण्याचा प्रयत्न केला जाईल. सामाजिक अंतर पाळून तंत्रज्ञानाच्या मदतीने इथून पुढे तिकीट तपासणी अथवा इतर कामे केली जातील.
अशीच एक पायलट प्रक्रिया अलाहाबाद (प्रयागराज) रेल्वे स्टेशनवर आधीच सुरू आहे, ज्यामध्ये सामाजिक अंतरावर जास्तीत जास्त भर देऊन, तिकिट तपासणीची प्रक्रिया सुरु आहे. ऑनलाईन तिकिटे खरेदी करताना आता क्यूआर कोड दिला जाईल आणि जर तिकिट काउंटरद्वारे बुक केले गेले तर प्रवाशाला एसएमएसद्वारे QR कोड मिळेल. एका लिंकवर क्लिक झाल्यावर QR कोड दिसेल.
तिकिटाचा QR कोड प्रवेशद्वारावर तपासला जाणार
प्रवासी रेल्वे स्थानकात प्रवेश करताच तिकिटाचा QR कोड प्रवेशद्वारावर तपासला जाईल.ज्यामुळे रेल्वेला काम करणे आणखी सोपे होईल. तर प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंग देखील केले जाईल आणि डेटा त्या प्रवाशांंसाठी संग्रहित केला जाईल. QR कोडचे हे स्कॅनिंग मोबाईल अॅॅप्लिकेशन आणि डिव्हाइसद्वारे केले जाईल.
स्टेशनच्या प्रवेशद्वारावर प्रवाश्यांचा QR कोड तपासताच, माहिती सर्व व्यक्तींसह, विशेषत: ट्रेनच्या टीटीईला शेअर केली जाईल. तिकिटांचा QR कोड स्कॅन करण्यासाठी आता सर्वच गाड्यांवरील टीटीईकडे एक डिव्हाईस असेल. QR कोड स्कॅन होताचं टीटीईकडे तिकिट आणि प्रवाशाची सर्व माहिती असेल.
याशिवाय प्रत्येक ट्रेनमध्ये हालचालींचा मागोवा घेण्यासाठी जीपीएस उपकरणे असणार आहेत आणि त्यासाठी भारतीय रेल्वे आणि इस्रो यांच्यात खास भागीदारी झाली आहे.