UC वेबने भारतातील कर्मचाऱ्यांंना बसवले घरी, तर अॅप बंदीनंतर क्लब फॅक्टरीने विक्रेत्यांचे रोखले पेमेंट्स
अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेडची सहाय्यक कंपनी यूसी वेबने भारतातील कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. एक पत्रक जारी करून कर्मचाऱ्यांना यूसी वेब भारतातील सर्व कार्य थांबवत असल्याचं सांगितलं आहे.
गेल्या महिन्यात हिमालयीन सीमेच्या विवादित भागात भारतीय आणि चिनी सैन्याच्या दरम्यान झालेल्या चकमकीनंतर भारताने या अॅप्सवर बंदी घातली आहे. भारत सरकारने चायनीज अॅॅपवर घातलेल्या बंदीमुळेच यूसी वेबने हा निर्णय घेतला असल्याचं म्हंटले जात आहे.
दशकांपूर्वी भारतात दाखल झालेल्या यूसीवेबने एका न्यूज अॅप (news app) व व्हिमेट (Vmate) शॉर्ट व्हिडिओ अॅपसह ब्राउझर चालविला होता. मात्र त्यांनी 15 जुलै रोजी एक पत्रक जारी करत कर्मचार्यांना नोकरी गेले असल्याचे सांगितले.
या पत्रात कंपनीने म्हंटले आहे की, यूसीवेब आणि व्हिमेट यांच्यावर भारत सरकारने लादलेल्या बंदीमुळे आतापर्यंत पुरवली जाणारी सेवा संपुष्टात आणली जात आहे, यामुळे कंपनीची भारतात सेवा सुरू ठेवण्याच्या क्षमतेस अडथळा निर्माण झाला आहे.”
यूसीवेबने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी शासनाच्या आदेशाचे पालन केले आणि सेवा बंद केल्या आहेत. परंतु त्यांनी ऑपरेशन पूर्णपणे बंद केले आहे की नाही यावर भाष्य केले नाही. तर चिनी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाने यावर टिप्पणी करण्यास नकार दिला आहे.
यूसी ब्राउझरचे भारतात 130 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत. तर कंपनीचे भारतात 100 प्रत्यक्ष कर्मचारी आणि शेकडो तृतीय-पक्षाचे कर्मचारी आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अॅप बंदीनंतर क्लब फॅक्टरीने विक्रेत्यांचे रोखले पेमेंट्स
तर दुसरीकडे अजून एक चायनीज कंपनी क्लब फॅक्टरी (Club Factory) वेबसाईटने देखील आपण भारतातील सर्व सेवा थांबवत असल्याचं जाहीर केले आहे. त्यांनी आपल्या विक्रेत्यांना एक ईमेल करून सांगतिले आहे की, भारत सरकारने घातलेल्या बंदीमुळे आणि सांगितलेल्या नियमांचे पालन करत असल्याने सध्यातरी सर्व कामकाज थांबले आहे. त्यामुळे विक्रेत्यांचे जे शिल्लक पैसे देण्यास नकार दिला आहे.
क्लब फॅक्टरीने विक्रेत्यांशी केलेल्या त्यांच्या वचनबद्धता (commitments) रद्द करण्यासाठी “फोर्स मॅजेअर इव्हेंट” लागू केला आहे. क्लब फॅक्टरी प्रामुख्याने फॅशन आणि अॅक्सेसरीजची उत्पादने विकते. मात्र भारत सरकारने 59 चायनीज अॅॅपवर घातलेल्या बंदीमध्ये क्लब फॅक्टरी देखील असल्याने त्यांची सेवा खंडित झाली आहे.
बंदीनंतर लगेचच क्लब फॅक्टरीने त्यांची URL वेगवेगळ्या आयपी अॅॅड्रेस द्वारे चालवण्याचा प्रयत्न केला होता. तर गुगल प्लेस्टोरने क्लब फॅक्टरीवर बंदी घातल्यानंतर त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर थेट अॅप डाउनलोड करण्याची लिंक देखील शेअर केली होती.
मात्र आता क्लब फॅक्टरीने एक निवेदन जरी केले आहे. त्यात ते म्हणतात की, क्लब फॅक्टरी टीम सरकारच्या निर्देशांचे पालन करण्यास समर्पित आहे आणि त्यांच्याकडे असलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आणि वेळोवेळी आवश्यक असलेली आवश्यक कागदपत्रे वेळोवेळी सादर करण्यासाठी सरकारबरोबर लक्षपूर्वक काम करत आहे.