अॅॅसिड पडल्याचं निमित्त झालं आणि बेल यांच्या टेलीफोनचा अनपेक्षितरीत्या शोध लागला
वायरलेसच्या जमान्यातही सरकारी कचेऱ्यांमध्ये आणि काही कार्यालयांमध्ये टेलिफोन आपल्याला पहायला मिळतो. एकेकाळी हाच टेलिफोन प्रत्येकाच्या घरातील एक सदस्य होता. मात्र जस जसे वायरलेसचा विकास होत गेला तसा टेलीफोनचा वापर कमी होत गेला. आणि सध्याच्या काळात तो कालबाह्य झाला आहे. इतिहासात डोकावले असता असे लक्षात येते की, टेलीफोनच्या आविष्कारानंतरच जग जवळ येण्यास सुरवात झाली. याच टेलीफोनचा अविष्कार नेमका झाला तरी कसा आणि पहिल्या संदेशाचे वहन कसे झाले ? हे आज आम्ही या लेखातून सांगणार आहोत.
टेलीफोनचा शोध अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी लावला हे तर आपण अनेकदा ऐकले आहे. मात्र अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांच्या डोक्यात ही संकल्पना आली कुठून हा देखील एक संशोधनाचा विषय आहे.
अलेक्झांडर ग्रॅहम बेल
अलेक्झांडर ग्रॅहम बेल हे जन्माने स्कॉटीश होते. त्यांचा जन्म 3 मार्च, 1847 मध्ये झाला. अलेक्झांडर ग्रॅहम बेल हे जन्मात:च हुशार होते. त्यांनी वयाच्या 13 व्या वर्षीच पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अवघ्या 16 व्या वर्षीचं बेल हे समाजात म्युझिक टीचर म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी आपल्या संगीत कलेतही संशोधन करून 26 व्या वर्षी दूरपर्यंत आवाज फेकणारा पियानो तयार केला.
ध्वनी विज्ञानातून टेलिफोनची संकल्पना
अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांची आई आणि पत्नी या दोघींचीही श्रवण क्षमता कमजोर होती. त्यांच्या या आजारामुळेचं बेल यांना ध्वनी विज्ञान म्हणजेच science of soundमध्ये मोठी आवड निर्माण झाली.
ध्वनी विज्ञानाचा अभ्यास करतानाचं कालांतराने बेल यांच्या हे लक्षात आले की, टेलीग्राफ तारेच्या माध्यमातून ध्वनी संचारण होऊ शकते. त्यानंतर बेल यांनी यावर शोधकार्य सुरु केले. या संशोधनात बेल यांनी आपला सहकारी थॉमस वॉटसनची मदत घेतली.
मिस्टर वॉटसन आय वाँट टू सी यु ! पहिला संदेश
अनेकदिवस यंत्रांची जोडणी करूनही बेल यांच्या प्रयोगाला यश मिळत नव्हते. तारेतून ध्वनी संचारण होण्यास नेहमीचं काहीना काही अडचणी येत होत्या. 10 मार्च 1876ला बेल आपल्या खोलीत संशोधन करत होते. तर सहकारी वॉटसन हा वरच्या खोलीत काम करत बसले होते. मात्र काम करताना अचानक बेल यांच्या पँटवर अॅॅसिड पडले. त्यावेळी बेल यांनी वॉटसनला मदतीस येण्यास सांगितले. हा संदेश वॉटसन यांना त्यांच्या जवळ असलेल्या एका यंत्रातून मिळाला आणि तोच दिवस इतिहासातील एक अविष्कार म्हणून गणला गेला.
नेमकंं त्या दिवशी अशी कोणत्या तारेची योग्य जोडणी झाली की ज्यामुळे ध्वनी संचारण झाले, हे बेल आणि वॉटसन यांना देखील काही काळ समजले नाही. मात्र हा पहिला दोन व्यक्तींमधील संवाद होता जो एका यंत्राच्या माध्यमातून झाला होता. हा संदेश असा होता की, मिस्टर वॉटसन आय वाँट टू सी यु.
चमत्काराशिवाय नमस्कार नाही
बेल यांनी लगेचचं टेलीफोनचे स्वतःच्या नावाने पेटंट बनवले. सुरवातीला अनेकांनी बेल यांच्या या प्रयोगाचा स्वीकार केला नाही म्हणून बेलने टेलीफोनचा सार्वजनिक प्रयोग करण्याचा विचार केला. चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे बेल यांनाही तेव्हा कळाले.
पहिल्या प्रयोग बेल यांनी बोस्टन येथील ‘अमेरिकन अॅॅकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या अभ्यासकांसमोर केला. त्यानंतर इथल्या तज्ज्ञांनी फिलाडेल्फियामधील अमेरिकन स्वातंत्र्य शताब्दी समारंभात आपले यंत्र सादर करण्याचे बेल यांना सुचविले. या सोहळ्यात या यंत्राची करामत पाहिल्यानंतर सर्वत्र बेल यांच्या टेलिफोन विषयी चर्चा होऊ लागली.
टेलिग्राफ आणि टेलीफोनमध्ये स्पर्धा
बेल यांच्या या प्रयोगानंतर टेलीग्राफ आणि टेलीफोनमध्ये स्पर्धा होऊ लागली. टेलीग्राफ कंपन्या व्यावसायिकपणे टेलिफोन बाजारात आणण्यास तयार नव्हत्या. कदाचित त्यांना भीती वाटू लागली की टेलीफोनमुळे टेलीग्राफ डिव्हाइसचा वापर कमी होईल.
हे पाहून, बेल आणि त्याचा सहकारी वॉटसन यांनी ठरवले की टेलीफोनच्या उपयोगितेचे महत्व लोकांसमोर मांडायला हवे. 1876ला बेल यांनी पहिली टेलिफोन कंपनी खोलली. तिला ‘एटी अँड टी’ ऐतिहासिक कंपनी म्हणून ओळखले जाते.
इंग्लंडच्या राणीने बेल यांच्या टेलीफोनला दिली मान्यता
तसे पहायला गेले तर बेल यांच्या या टेलीफोनची खरी प्रसिद्धी इंग्लंडच्या राणीने केली. अमेरिकेच्या टेलिग्राफ कंपनीकडून वारंवार येणाऱ्या नकारामुळे बेल हे हाताश झाले होते. त्याचवेळी बेल यांच्या या यंत्रांची महती ऐकून इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाने बेल यांना हे यंत्र घेऊन येण्याचे निमंत्रण धाडले. हे यंत्र आणि त्यामधून होणारे ध्वनी संचारण पाहून राणी व्हिक्टोरियाने आपल्या राजवाड्यात असे दोन यंत्र बसवण्याची परवानगी दिली. त्यानंतर मग बेल यांचा हा टेलिफोन युरोपात भलताचं लोकप्रिय आणि प्रसिध्द झाला. युरोपातील टेलीफोनची ही प्रसिद्धी पाहून अमेरिकेनेही याच्या प्रचार आणि प्रसारास प्राधान्य दिले.
पहिला ट्रांस कॉन्टिनेंटल टेलीफोन कॉल
पहिला ट्रांस कॉन्टिनेंटल टेलीफोन कॉल म्हणजे महाद्विपाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला पहिला संदेश 15 जानेवारी 1915 ला टेलिफोनच्या माध्यमातून पाठवण्यात आला. यावेळी बेल हे अमेरिकेतील पूर्व किनारपट्टीवर असलेल्या न्यूयॉर्कमध्ये होते तर सहकारी वॉटसन हे पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या सॅॅनफ्रान्सिस्कोमध्ये होते. त्यांच्यात हा कॉल झाला होता. यानंतर दिवसेंदिवस रोजच्या जीवनात फोनची गरज आणि अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांची प्रसिद्धी वाढतचं गेली.