दोन मुलांच्या खेळाने जगाला मिळाली दुर्बीण, गॅॅलीलिओंनी याचाचं वापर करून जगाला दिले खगोलज्ञान

0

दुर्बिणीचा शोध लागल्यानंतर जगात खगोलशास्त्राच्या अभ्यासाला मोठी चालना मिळाली, असे सांगितले जाते. सुरवातीला या दुर्बिणीचा उपयोग युद्धभूमीवर  शत्रूच्या सैन्यावर लक्ष ठेवण्यासाठी झाला.  मात्र याच दुर्बिणीची करामत आणि दूरवरच्या गोष्टी जवळ दिसण्याच्या गुणधर्माची ख्याती ऐकून  वैज्ञानिक गॅॅलीलिओ गॅॅलिली (Galileo Galilei) यांनी या दुर्बीणाचा उपयोग अवकाश निरीक्षणासाठी केला. गॅॅलीलिओ यांच्या हाती लागलेल्या या अद्भुत यंत्रामुळेच खगोलातल्या अनेक गोष्टी आणि शोध पुढे आले. मात्र याच दुर्बिणीची निर्मिती झाली कशी आणि ती केली कोणी ? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

दुर्बिणीचा शोध कोणी लावला असा प्रश्न आपण जर कुणाला विचारला असता तर बरेचजण वैज्ञानिक आणि खगोलतज्ञ गॅॅलीलिओ गॅॅलिली यांचे नाव सांगतील. हे चूक आहे… अस आपण म्हणू शकत नाही. कारण दुर्बिणीचा अवकाश निरीक्षणासाठी प्रथम वापर गॅॅलीलिओ यांनीच केला. मात्र ह्या दुर्बिणीची संकल्पना ही गॅॅलीलिओ यांची नव्हती. ही खरी संकल्पना हॅॅन्स लिपरशे ( Hans Lipperhey) यांची होती.

Hans Lipperhey

कोण होते हॅॅन्स लिपरशे ?

सतराव्या शतकात हॅन्स लिपरशे हे चष्म्याचे विक्रेते होते. ते मुळचे जर्मन होते. मात्र ते नंतर  हॉलंडमध्ये स्थायिक झाले. १६०२मध्ये  त्यांना हॉलंडचे नागरिकत्व मिळाले. १७ व्या शतकाच्या सुरुवातीला मानवाला काचेपासून भिंगे बनवण्याची कला अवगत झाली होती. या भिंगांचा वापर नजर कमी झाल्यानंतर पाहण्यासाठी अथवा मजकूर वाचण्यासाठी लोक करत असे. चाळीशीनंतरच्या पुढच्या अनेक वृद्धांकडे असे भिंगे असायचे.  याच भिंगांनी एकेदिवशी कमाल केली.

त्या दोन मुलांच्या खेळामुळे दुर्बिणीची संकल्पना आली समोर

दुर्बिणीची संकल्पना  एका खेळातून पुढे आली. हॅन्स लिपरशे  यांच्या दुकानात दोन मुले काम करत होती. या मुलांना चष्म्याच्या काचांमधून सतत बघायची सवय होती. ही मुलं काच डोळ्यासमोर धरून सतत काहीतरी न्याहाळत असत. एकेदिवशी याच मुलांनी दोन भिंग एकमेकांसमोर धरली आणि त्यांना दूरच्या गोष्टी जवळ दिसू लागल्या. या मुलांना हे फार मजेशीर वाटले. ते वारंवार तसे करू लागले. समोर धरलेली भिंगंं ते पुढे मागे करू लागले. त्यामुळे वस्तू कधी जवळ तर कधी लांब दिसू लागली.

एकेदिवशी लिपरशे या मुलांचा खेळ बघत होते. त्यानंतर त्यांनी त्या मुलांना खडसावले. काय रे हे काय करताय ? या मुलांनी लिपरशे यांना देखील या भिंगांची कमाल दाखवली. ते पाहून लिपरशे देखील थक्क झाले. त्यांनी एका चर्चच्या छतावर बसलेला पक्षी दोन भिंगांना सामोरासमोर ठेवून पाहिला. हा पक्षी लिपरशे यांना फारच जवळ दिसला. लिपरशे यांना देखील हा खेळ आवडला.

लिपरशे यांनी बनवली दुर्बिण

प्रत्येक वेळी हातामध्ये दोन भिंग धरून मागे-पुढे करत बसणे आणि त्यामधून दूरची वस्तू बघणे गैरसोयीचे होते. म्हणून लिपरशे यांनी एकमेकांत बसतील आणि सहज सरकतील, अशी दोन लांब नळकांडी घेतली. प्रत्येक नळकांडय़ाच्या टोकाला भिंग बसवली. त्यानंतर अजून एक जास्त व्यासाचे नळकांडे घेतले. त्यामध्ये हे कमी व्यासाचे नळकांडे बसवले. आणि ते सहज फिरून कधी आत तर कधी बाहेर येऊ लागले. त्यामुळे कधी लांबचे. तर कधी जवळचे पाहता येऊ लागले. आपण तयार केलेल्या दुर्बणिीतून लांबवर असलेल्या वस्तू कशा दिसतात, याचे निरीक्षण करण्यात लिपरशे गढून जात असे. या दुर्बिणीमध्ये लिपरशे यांनी प्रयोग देखील केले. दुर्बिणीत कधी दोन बहिर्वक्र काचा वापरल्या तर कधी एक बहिर्वक्र तर एक अंतर्वक्र काच बसवून दुर्बीण बनवली.

लिपरशे यांना दुर्बिणीचे पेटंट नाकारले…

दुर्बिणीवर वेगवेगळे प्रयोग केल्यानंतर लिपरशे यांनी १० सप्टेंबर १६०८ साली पेटंटसाठी अर्ज केला. पण लिपरशे यांनी  लावलेला हा शोध अत्यंत साधा आहे, अशा प्रकारची दुर्बीण तयार करणे कुणालाही शक्य असल्याने हा शोध गुप्त ठेवणे किंवा त्यामध्ये काही गोपनीयता ठेवणे शक्य नाही, असे स्पष्टीकरण देऊन लिपरशे यांना दुर्बणिीचे पेटंट देण्यास नकार दिला.

Galileo

लिपरशे यांची दुर्बीण गॅॅलीलिओ यांच्या हाती…

पेटंट नाकारल्यानंतर लिपरशे हे इटलीतील व्हेनिस येथे आले. लिपरशे यांच्या याच दुर्बिणीची गोष्ट गॅॅलीलिओ यांना कळाली. त्यानंतर गॅलिलिओ यांना  दुर्बणिीचे महत्त्व उमगले. लिपरशे यांनी तयार केलेल्या दुर्बणिीसारखीच पण कित्येक पटींनी चांगल्या दर्जाची दुर्बीण गॅलिलिओ यांनी बनवण्यास सुरवात केली. मात्र ही दुर्बीण बनवण्या मागचा त्यांचा हेतू हा काही वेगळाच होता.

गॅलिलिओ यांना पृथ्वीवरील लांबच्या गोष्टी या दुर्बिणीतून पाहण्या पेक्षा अवकाशातील गोष्टी पहायचा छंद होता. त्यामुळेच त्यांनी या दुर्बिणीचा उपयोग चंद्र,ग्रह,  तारे,  पाहण्यासाठी केला. कालांतराने गॅलिलिओ यांनी दुर्बणिीच्या रचनेचा सखोल अभ्यास केला. त्याचप्रमाणे भिंगाचा आकार आणि भिंग  तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काचेचे गुणधर्म याचाही अभ्यास केला. लिपरशे यांनी  वापरलेल्या भिंगापेक्षा कित्येक पटीने चांगल्या दर्जाची भिंगे बनवण्याची कलासुद्धा गॅलिलिओ यांनी अवगत करून घेतली.

वेगवेगळ्या प्रयोगांनंतर गॅलिलिओ यांची ही दुर्बीण खगोलशास्त्राच्या अभ्यासास उपयुक्त ठरली. त्यातूनच गॅलिलिओ यांनी गुरु या ग्रहाचा अभ्यास केला. तर त्याला चार चंद्र असल्याचं सांगितले. तसेच सूर्य हा केंद्रस्थानी असून त्याच्याभोवती इतर ग्रह फिरत आहेत, असेही  गॅलिलिओ यांनी सांगितले. गॅलिलिओ यांच्या या शोधाचा काही कॅथलिकांनी धिक्कार केला व हे धर्माच्या विरुद्ध आहे असे, सांगून गॅलिलिओ यांना कैदेत टाकले. कॅथलिक आणि गॅलिलिओ यांच्या संघर्षाची  एक वेगळी कथा होऊ शकते. त्यामुळे आता तरी एवढेच समजून घेऊ की, गॅलिलिओ यांना खगोलविज्ञानाची दारे खुली देण्यामागचे श्रेय हॅन्स लिपरशे यांच्या दुर्बिणीलाच जाते. पण खरे श्रेय जाते ते त्या दोन मुलांना. त्यांनी जर भिंगांची रचना केली नसती तर आज दुर्बीणीचा शोध जगाला काही उशिराने लागला असता.

हे पण वाचा

अ‍ॅॅसिड पडल्याचं निमित्त झालं आणि बेल यांच्या टेलीफोनचा अनपेक्षितरीत्या शोध लागला

पहिल्या मोबाईलची गोष्ट ! एका कॉमेकमुळे सर्व जग बदललं आणि सर्वांच्या हातात मोबाईल आला

का बरंं फोनवर बोलताना Hello असे म्हणतात ? नाही माहित ना…! तर असा आहे इतिहास…

Leave A Reply

Your email address will not be published.