#जन्मदिन विशेष : मेरी आवाज ही, मेरी पहचान हैं ! लता ‘आत्म्याचा आवाज’

3

गानकोकिळा लता मंगेशकर या भारताचा नाही तर अखिल विश्वातल्या सुप्रसिद्ध गायिका .त्यांच्या आवाजाची किमया फक्त भारतीयांवरच नाही तर विदेशात देखील पसरलेली आहे .जोपर्यंत चंद्र सूर्याचे अस्तित्व या भूतलावर आहे तो पर्यंत लतादीदींच्या आवाजाचे गारूड प्रत्येकाच्या मनावर कायम राहणार असं म्हणायला हरकत नाही . लता मंगेशकरांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्यप्रदेशमधल्या इंदौर येथे झाला. त्यांच पाळण्यातल नाव ‘ ह्रिदया ‘. दीदींना संगीताचे धडे त्यांच्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल- कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली.

Lata Mangeshkar

लता दीदी अवघ्या 12-13 वर्षांच्या असताना त्यांचे वडील गेले. तेव्हा नवयुग चित्रपट कंपनी चे मालक – मास्टर विनायक यांनी लता दीदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला. लता दीदींना ‘ नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी ‘ हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेलं गाणं वसंत जोगळेकरांच्या ‘ किती हसाल ‘ या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणं चित्रपटातुन वगळलं गेलं. मास्टर विनायकांनी लताबाईंना नवयुग च्या ‘ पहिली मंगळागौर ‘ या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. या चित्रपटात त्यांनी ‘ नटली चैत्राची नवलाई ‘ हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेलं गीत गायले. 1945 मध्ये जेव्हा मास्टर विनायकाच्या कंपनी – कार्यालयाच स्थानांतर मुंबईला झालं, तेव्हा लताबाई मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत खान यांच्या कडून हिंदुस्थानी शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या.

 

1948 मध्ये संगीतकार गुलाम हैदरांनी लतादीदींना मार्गदर्शन केल. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम, यांसारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या. लता दीदींनी स्वतःच्या गाण्याची एक वेगळी शैली बनवली. लोकप्रिय चित्रपट ‘महल’ चे ‘आयेगा आनेवाला ‘ हे गाणं लता दीदींच्या कारकिर्दीला एक महत्वाच वळण देऊन गेलं. 1950 च्या दशकात संगीतकार नौशाद यांच्या दिग्दर्शनाखाली ‘बैजू बावरा’, ‘ मुगल – ए – आझम ‘, ‘कोहिनुर ‘ या चित्रपटासाठी शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी गायली. लतादीदींना ‘ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका ‘ म्हणून प्रथम फिल्मफेअर पुरस्कार सलील चौधरींनी स्वरबद्ध केलेल्या ‘ आजा रे परदेसी ‘ या मधुमती चित्रपटातल्या गाण्यासाठी मिळालं.

1960 च्या दशकात लता दीदी निर्विवादपणे हिंदी चित्रपट सृष्टीतल्या प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या. 1962 मध्ये हेमंत कुमार यांच संगीत दिग्दर्शन असलेल्या ‘ कही दीप जले कही दिल ‘ या गाण्यासाठी दुसरा फिल्मफेअर पटकावला. लतादीदींनी मराठी चित्रपटांसाठी अनेक गाणी गायली. त्यांनी ज्या नामांकित संगीतकारांसोबत काम केल त्यांमध्ये ह्रिदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळे आणि सुधीर फडके यांचा विशेष उल्लेख करता येईल. ‘ ने मजसी ने परत मातृभूमीला ‘ या गाण्यातून स्वातंत्र्यवीर सावरकररांनी भारतमातेविषयी असलेली तळमळ आपल्या आवाजातून त्यांनी पोहोचवली. तर ‘ ऐ मेरे वतन के लोगो ‘ या गाण्यातून सीमेवर लढणाऱ्या महत्व त्यांनी पटवून दिल. हे गाणं ऐकून आपण आजही हळवे होतो. पण त्याकाळी दीदींच्या सुमधुर कंठातून हे गीत ऐकून पंडित जवाहरलाल नेहरुंच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. लता दीदींची गाणी ऐकली की प्रत्येकाच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा येते, रक्त सळसळत.

लता दीदींच गाणं म्हणजे ‘ sound of soul ‘ आहे. तो एक आत्म्याचा आवाज आहे. त्यांच्या शब्दांमधून भाव प्रकट होतात. मुळात गाण्यात भाव असतात, ते त्यांना कधी आणावे लागले नाहीत. 2001 साली लता दीदींना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. का दिला त्यांना भारतरत्न? तर त्यांचं गाण्याशी असलेलं ईमान !!! 70 वर्ष त्या गायल्या. त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून त्यांचं हे ईमान आपल्याला दिसतं. कलेशी किती प्रामाणिक असलं पाहिजे याच एकमेव उदाहरण म्हणजे लतादीदी…
शेवटी कवी गुलजार यांनी म्हटलंच आहे –

” नाम गुम जायेगा,
चेहरा ये बदल जायेगा,
तेरी आवाज ही, तेरी पहचान हैं, गर याद रहे….”

– कोमल पाटील 

Lata Mangeshkar 3

Leave A Reply

Your email address will not be published.