Earth Day 2021 | उज्ज्वल भवितव्यासाठी बीज रोपण करा

Earth Day 2021 | उज्ज्वल भवितव्यासाठी बीज रोपण करा, जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने गुगल-डुडलचा संदेश

0

जागतिक वसुंधरा दिनानिमित्ताने (Earth Day 2021) गुगलने डुडलच्या (Google Doodle) माध्यमातून एक आगळा वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. पृथ्वीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रत्येकाने एक बीजाचे रोपण करा (Plant Seeds Brighter Future) असा संदेश देण्यात आला आहे.

Earth Day 2021 : आज जगभर जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातोय. त्यानिमित्ताने गुगलने डुडलच्या माध्यमातून एक अनोखा संदेश दिला आहे. पृथ्वीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रत्येकाने एक बीज रोपण करा असा संदेश गुगलने दिला आहे. दरवर्षी जागतिक वसुंधरा दिवस साजरा करताना एक थीम तयार करण्यात येते. या वर्षीची थीम आहे ‘रिस्टोअर अवर अर्थ’.

गुगलच्या डुडलमध्ये नेमकं काय?
जागतिक पृथ्वी दिनानिमित्त गुगलने साकारलेल्या डुडलमध्ये एका मोठ्या वृक्षाच्या सावलीत एक महिला पुस्तक वाचत असते. त्यानंतर सुरुवातीला एक लहान मुलगी रोपटं लावते. ते रोपटं काही वर्षांनी मोठ्या वृक्षात रुपांतरित होते. यानंतर ती तिच्या मुलाला रोप लावायला शिकवते. कालांतराने तेही झाड बहरतं. त्यानंतर तो व्यक्ती त्याच्या मुलांना रोप लावायला देतो आणि तेही रोप छान बहरते. यानंतर पुढे काही वर्षांनी प्रत्येक जण इतरांना वृक्षरोपण करण्यास प्रोत्साहन करतो, असे या व्हिडीओत दाखवण्यात आले आहे.

या व्हिडीओतून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला झाडे लावण्याची शिकवण देत असल्याचे स्पष्ट होत आहे. यातून आपण कशाप्रकारे वसुंधरेचे संवर्धन केले पाहिजे याचाही धडा मिळत आहे.

दर वर्षी 22 एप्रिलला हा दिवस जागतिक पातळीवर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. या दिवसाच्या निमित्ताने पर्यावरण आणि सजीवांच्या जीवनात असलेले पृथ्वीचे महत्व या विषयांवर जागरुकता निर्माण केली जाते. तसेस विशेषकरून, लहान मुलांमध्ये या दिवसाबद्दल जागरुकता करण्यात येते.

का साजरा केला जातो वसुंधरा दिवस?
सजीवांच्या जीवनात पृथ्वी अर्थात वसुंधराचे योगदान अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे या पृथ्वीचे आणि त्यावरील पर्यावरणाचे संरक्षण करणे तसेच त्याच्या महत्वाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी 1970 सालापासून जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातोय. आज जगातील 192 पेक्षा जास्त देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातोय. सध्या जगासमोर ग्लोबल वॉर्मिंग, प्रदुषण आणि पर्यावरणासंबंधी इतर अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. त्यामुळे पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात आलं आहे. अशा परिस्थितीत पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण करणे, पर्यावरणाची गुणवत्ता टिकवून ठेवणे आणि त्याचे संरक्षण करणे यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे.

वसुंधरा दिनाची संकल्पना अमेरिकेतील सिनेटर गेलार्ड नेल्सन यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी या दिवसाची कल्पना मांडली होती. त्यांनी अमेरिकेतील 2 कोटींपेक्षा जास्त लोकांमध्ये पर्यावरणाच्या समस्यांबाबत जनजागृती केली. प्रदूषण आणि वन्यजीवांचा ऱ्हास या मुद्यावर त्यांनी आवाज उठवला. हवा, पाणी, वने आणि वन्यजीव, निसर्ग यांच्या संरक्षणासाठी त्यांनी तिथे राजकीय दबाव निर्माण केला. त्यांच्या या कल्पनेला जगभरातून मान्यता मिळाली आणि 1970 साली पहिल्यांदा जागतिक वसुंधरा दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर 22 एप्रिल हा दिवस वसुंधरा दिन किंवा Earth day म्हणून मानला जाऊ लागला. (Google Doodle 0n Earth Day 2021)

जगभरातील नैसर्गिक साधन संपत्तीचे विकासाच्या नावाखाली शोषण केलं जात आहे. गेल्या 50 वर्षात यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पृथ्वीवरच्या साधनसंपत्तीचा समतोल बिघडत असून त्याचा परिणाम हा जागतिक तापमानात वाढ, प्रदुषण तसेच इतर अनेक घटकांच्या माध्यमातून दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या पीढीने याचे महत्व समजून घेऊन शाश्वत विकासाकडे पाऊल टाकले पाहिजे. यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे.

दरवर्षी हा दिवस उत्साहाने साजरा केला जातोय. पण या वर्षी कोरोनाचे संकट लक्षात घेता वसुंधरा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याला मर्यादा आल्या आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.